Tuesday, July 27, 2010

आईचा वाढदिवस!

आजही पापण्यांचे दरवाजे मिटले की ती मायेची उब, अलगद अंगावर शहारे उठवुन जाते. तो स्पर्श, मनाला बेकल करतो. आठवणींच्या गावामध्ये, बालपणीच्या रानामध्ये, मिश्कील हरकतींच्या किलबिलाटामध्ये आपण नकळत ठाण मांडतो.

आपल्याला हवे ते हवे तेव्हा खाऊ घालणारी आई!

शाळेतल्या पहिल्या दिवशी आपल्या आधी तयार होणारी आई!

पहिल्या दिवशी शाळेत जाणारा मी नजरेआड होऊन वर्गात जाईपर्यंत कौतुकाने बघत राहणारी आई!

शाळा सुटण्याआधी आपल्याआधी शाळेच्या जिन्याखाली ताटकळत उभी राहणारी आई!

आपल्याला ठेचकाळले की जोरात रागावणारी आई, त्याचवेळेला तेवढ्याच मायेने मिळेल ते करून रक्त थांबवण्याचा प्रयत्न करणारी आई!

आम्ही झोपल्यानंतरही काम करणारी आणि आम्ही उठण्याआधीपासुन काम करणारी आई!

कदाचित झोपेतही संसाराच्या जबाबदा-यांची बेरीज वजाबाकी करणारी आई!

आपल्या बोलण्यावरून आपली संगत ओळखणारी व दाटून बरोबर काय अन चूक काय हे ठसवणारी आई!

माझ्यासाठी कुणाशीतरी भांडणारी आणि भांडण्याचा मुळात पिंडच नसल्याने डोळ्यात आलेलं पाणी लपवणारी आई!

खस्ता खातानाही हसता येते आणि कुणाला न दाखवता मनातून मूक रडता येते हे पहिल्यांदा आईकडूनच तर शिकलो.

सगळ्यांची भूक शमल्यानंतर, सगळ्यांचे ढेकर ऐकल्यानंतर रिकाम्या भांड्याला पाहूनही पोट भरता येते हे आईशिवाय कोणी सांगू शकेल बरे?

परीक्षेत आपण पहिले आल्यानंतर सगळ्यांच्या हसण्यामध्ये गुपचुप देवासमोर जाऊन समाधानाचे अश्रु गाळणारी आई!

आपल्या आवडी निवडी पूर्ण करता याव्यात म्हणून प्रत्येक वैयक्तिक सुखाला कात्री लावणारी आई!

आज तारुण्यात काही मनासारखे नाही झालं म्हणून चीडचीड करणारे आपण अन तेव्हा तिच्या ऐन तारुण्यात शंकराच्या पिंडीवर बेलाच्या पानांप्रमाणे स्वतःच्या आनंदाला वाहणारी आई!

शाळेमध्ये फी भरण्यासाठी सकाळी आपण उठण्याआधी वडिलांशी बोलून, आपली हौस बाजूला सारून आवडता दागिना काढून देणारी आई!

कित्येक वर्षे आपल्याला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारी आई!

चार पैसे वाचावे म्हणून काटकसर करणारी, रात्रंदिवस काम करणारी आई!

त्यागाचे मूर्तीमंत उदाहरण कोणी असेल तर ती आईच!

सगळ्या परिस्थितींशी भांडून आपल्याला आपल्या योग्य ठिकाणी पोहचविण्यासाठी धडपडणारी आई!

वादळात, वीजांच्या गडगडाटात, मुसळधार पावसात, गरीबीमध्ये, उद्याचा आशेच्या किरण दाखवून आपला पाठपुरावा करणारी आई!

आपल्या स्वप्नांवर आपल्यापेक्षा जास्त विश्वास ठेवणारी व तिथपर्यंत पोहचण्यासाठी सतत प्रोत्साहन देणारी दैवी शक्ती म्हणजे आई!



शब्द नेहमीच थिटे पडले आहेत आईबद्दल लिहितांना! पण आपला उगाचच प्रयत्न करतोय आज कारण आमच्या मातोश्रीचा आज वाढदिवस! आणि तिला हैप्पी बर्थडे वगैरे म्हटले तर म्हणते 'तुम्ही मुलं कधी मोठे होणार काय माहिती, अरे माझा वाढदिवस का साजरा करावा?'. स्वतःचा वाढदिवस साजरा केलेला तिला अजिबात आवडत नाही. पण इतरांचा मात्र मनापासून आवडतो. तेवा आज आमच्या जिजाऊना वाढदिवसाच्या शुभेच्छा!

कवी यशवंतांची कविता आठवते,

शाळेतुनी घराला । येता धरील पोटी
काढून ठेवलेला । घालील घास ओठी
उष्ट्या तशा मुखाच्या । धावेल चुंबना ती
कोणी तुझ्याविना गे । का ह्या करील गोष्टी ?
तूझ्याविना न कोणी । लावील सांजवाती
सांगेल ना म्हणाया । आम्हा ’शुभं करोति’

स्वामी तिन्ही जगाचा । आईविना भिकारी.

No comments: